Call for participation in pre-selection of World Skills Competition
जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग घेण्याचे आवाहन
पुणे : पुढील वर्षी फ्रान्स (ल्योन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उमेदवारांची निवड होण्यासाठी जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पूर्वतयारीच्या निवडीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फ्रान्स (ल्योन) येथे ५२ क्षेत्रांशी संबंधित जागतिक कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
कौशल्य स्पर्धेचे जिल्हा, विभाग, राज्य तसेच देश पातळीवर आयोजन करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्री डिझाइन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री ४.०, इन्फर्मेशन नेटवर्क गॅबलिंग, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन आणि जल तंत्रज्ञान या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी १९९९ किंवा त्यानंतरचा तर इतर क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००२ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.
कौशल्य स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून निवड होणाऱ्या उमेदवारांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेमार्फत करण्यात येणार आहे.
स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम, हॉस्पिटॅलिटी संस्था, कॉर्पोरेट तंत्रज्ञान संस्था, कौशल्य प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीईटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, फाइन आर्टस कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिटयूट, इन्स्टिटयूट ऑफ ज्वेलरी मेकिंग तसेच इतर सर्व महाविद्यालये व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यामधील उमेदवारांना नोंदणी करता येईल.
इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर २० डिसेंबरपूर्वी नाव नोंदणी करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित संस्थांनी कौशल्य स्पर्धेबाबतची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र रास्तापेठ, पुणे या कार्यालयास भेट द्यावी किंवा दूरध्वनी क्र. ०२०-२६१३३६०६/ भ्रमणध्वनी क्र. ८०५५९९२९०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग घेण्याचे आवाहन”